हिमाचल प्रदेशमध्ये पुराचे थैमान सुरूच : वाहतूक पुर्णपणे विस्कळीत

नवी दिल्ली : भारताच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. उत्तर काशीसोबतच हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. आतापर्यंत लाहौल स्पितीपासून कुल्लूपर्यंत सर्व भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. ज्यामध्ये कुल्लू येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मनाली आणि कुल्लूदरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. बियास नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे कुल्लूतील बकारथच भागात रविवारी अडचणीची परिस्थिती उदभवली होती, ज्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्या ठिकणी असणाऱ्या प्रवाशांना दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढल्याची माहिती आहे.

दरम्यान, रविवारी हिमाचल आणि उत्तरकाशीच्या सीमालगतच्या भागात सहाजणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भूस्खलन झाल्यामुळे किलॉंग आणि सिस्सूदरम्यानच्या रस्त्यावर जवळपास चारशे प्रवासी अडकले आहेत. तर, लाहौल स्पिती भागात येणाऱ्या छोटा दरा, ग्रम्फू या ठिकाणहून आतापर्यंत दीडशे प्रवाशांना सुखरूप स्थळी पोहोचवण्यात आलं आहे. ज्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)