पुणे : चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (एनडीए) कडून जी जागा ताब्यात घेण्यात येणार आहे, त्याच्या मोबदल्याची रक्कम तूर्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देणार असून, महापालिका प्राधिकरणाला ती टप्प्याटप्प्याने देईल, असे हमीपत्र करण्याला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याविषयी माहिती दिली.
चांदणी चौकातील उड्डाणपूलासाठी “एनडीए’ची सुमारे 0.48 हेक्टर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. संरक्षण विभागाने या जागेचा मोबदला रोख स्वरूपात मागितला आहे. तेवढी रक्कम देण्याला महापालिका सद्यपरिस्थितीत असमर्थ आहे. त्यामुळे मध्यममार्ग काढून ही रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने “एनडीए’ला द्यावी आणि विकसनानंतर महापालिका टप्प्याटप्प्याने ती प्राधिकरणाला देईल, असे हमीपत्र महापालिका देऊ शकते, असे रासने म्हणाले.
या उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी जे भूसंपादन करायचे आहे त्यासाठी सुमारे 450 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महामार्गालगत असलेल्या संरक्षण विभागाच्या एनडीएची पॉइंट 48 हेक्टर जमीन देण्याला संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. परंतू या जमिनीचा रोख मोबदला महापालिकेने द्यावा अशी अट “एनडीए’ची आहे. महापालिकेकडे सध्या निधी नसल्यास महामार्ग प्राधिकरण ही रक्कम संरक्षण विभागाला देईल. उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर तो महापालिकेच्या ताब्यात आल्यावर महापालिका टप्प्याटप्प्याने महामार्ग प्राधिकरणास ही रक्कम अदा करेल, असे उच्च स्तरीय बैठकीत ठरले आहे.