अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस सज्ज

खास आपत्कालीन पथकांची नेमणूक : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केल्या उपाययोजना

पुणे – पावसाळ्याच्या काळात पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वर अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी खास आपत्कालीन पथकांची नेमणूक करण्यात आली आहेत. ही पथके महामार्गावर 24 तास पहारा ठेवणार आहेत. त्याशिवाय धोकादायक दरडीवर खास “नजर’ ठेवण्यात येणार आहे. तसेच संततधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत या महामार्गावरून पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. पाऊस आणि वाहनचालकांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे पावसाळ्याच्या कालावधीत या महामार्गावर अनेकदा अपघात झाले आहेत. या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याला अपेक्षित यश आले असले तरीही अपघात सत्र पूर्णपणे थांबलेले नाहीत. त्यामुळे यंदाचा पावसाळा सुरू होण्याच्या आधीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाशी संपर्क साधून रस्ते दुरुस्त करण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार ही कामे पूर्ण झाली असून घाट माथ्यावरील धोकादायक दरडीही हटविण्यात आल्या
आहेत.

पावसाळ्याच्या काळात वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, अशा सूचना महामार्ग पोलिसांच्या वतीने वारंवार देण्यात येत असतात. त्याशिवाय महामार्ग पोलिसांच्या वतीने सर्वच टोलनाक्‍यांवर वाहनचालकांना तशी समजही देण्यात येते. तरीही बहुतांशी वाहनचालकांचे वेगावर नियत्रंण नसल्याचे आतापर्यंतच्या पाहाणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकाराची महामार्ग पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अशा वाहनचालकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा महामार्ग पोलीस निरीक्षक दत्तात्रय गाढवे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.