वायनाड – कुठल्याही निवडणुकीसाठी एखाद्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवण्यावरून इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच होत असल्याचे नेहमी पाहावयास मिळते. मात्र, भाजपने उमेदवारी देऊनही एका उच्चशिक्षित तरूणाने विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची घटना केरळमध्ये घडली आहे.
भाजपने रविवारी केरळमधील काही उमेदवारांची यादी जाहीर केली. त्या यादीनुसार, वायनाड जिल्ह्यातील आदिवासींसाठी राखीव असणाऱ्या एका मतदारसंघातून मणिकांतन या 31 वर्षीय तरूणाला उमेदवारी देण्यात आली. एमबीएची पदवी मिळवलेला मणिकांतन पशुवैद्यकीय विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्याने मणिकांतन चर्चेचा विषय बनला. मात्र, त्याने एक व्हिडीओ जारी करून नम्रपणे उमेदवारी नाकारली. निवडणूक लढवण्याची संधी मिळणे ही खरी तर प्रतिष्ठेची बाब आहे. मात्र, अध्यापन क्षेत्रात मी समाधानी आहे. मी किंवा माझ्या
निकटवर्तीयांपैकी कुणीच राजकारणात सक्रिय नाही, असे म्हणत मणिकांतनने निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी मिळाल्याची बातमी कळेपर्यंत त्याविषयीची काहीच माहिती नव्हती, असेही त्याने नमूद केले. मणिकांतनच्या नकारामुळे भाजपची गोची झाल्याचे मानले जात आहे. उमेदवारी जाहीर करण्याआधी मणिकांतनशी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली होती का, ते तातडीने समजू शकले नाही.