‘माळेगाव’च्या आखाड्यात गाजणार उच्चांकी दर

बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्याप्रमाणे राज्यात उच्चांकी भाव देणारा एकमेव सहकारी साखर कारखाना मानला जातो. कारखान्याच्या या कामकाज पद्धतीमुळे गेटकेनधारकही माळेगावला ऊस घालण्यासाठी इच्छुक असतात.

कारखान्याचे 13 हजारांपेक्षा अधिक ऊस उत्पादक सभासदांना उच्चांकी दराचा लाभ मिळतो, त्यामुळे त्यांच्यासह गेटकेनधारकांना देखील उच्चांकी भाव घेण्याची सवय झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकी प्रचारत देखील उच्चांकी भावाचा मुद्दा गाजणार हे नक्‍की.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय आखाडा तापला आहे. राष्ट्रवादीच्या निळकंठेश्‍वर पॅनल व चंद्रराव तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलमध्ये लढाई होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

दि. 11 फेब्रुवारी रोजी अंतिम यादी जाहीर होणार आहे. असे असले तरीदेखील माळेगावच्या पंचक्रोशीत घोंगडी बैठकांना सुरुवात झाले आहे. दोन्ही पॅनल घोंगडी बैठकांद्वारे सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत आहेत. तर सभासदही “ऐकावे जनाचे करावे मनाचे’ या युक्‍तीप्रमाणे आपला कार्यभाग साधून घेत आहेत.

राष्ट्रवादीसाठी निवडणूक प्रतिष्ठेची
राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. शरद पवार यांच्या नावाने माळेगाव कारखाना राज्यात आणि देशात ओळखला जातो. चंद्रराव तावरे गटाने दोनवेळेस विजय संपादन केला होता. गेल्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीला माळेगाव कारखाना काबीज करायचा असून त्यांना रोखण्यासाठी तावरे गट काय रणनिती आखणार हे पाहणे उत्साहाचे आहे.

अजित पवार शड्डू ठोकून
राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार कारखान्याच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा शुभारंभ करून सांगता सभेला हजेरी लावणारे अजित पवार माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी मात्र अनेक सभा घेणार आहेत. अजित पवार यांनी तसे स्पष्ट देखील केले आहे. उपमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर असल्याने वेळेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे असे असले तरी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराचा शुभारंभ व सांगता सभे बरोबरच इतर सभाही अजित पवार गाजवणार आहेत. त्यामुळे माळेगाव कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार शड्डू ठोकून असणार आहेत.

पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या साखर कारखान्यांपेक्षा जास्तीचा दर माळेगाव कारखान्याने दिला आहे. गेल्या निवडणुकीत सभासदांना उच्चांकी भावाचा दिलेला शब्द आम्ही खरा करून दाखवला आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या व्हीएसआयने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट म्हणून माळेगावला पुरस्कार दिला आहे. उसाच्या भावासाठी माळेगावच्या सभासदांना भाववाढीसाठी पाच वर्षात मोर्चा काढण्याची वेळ आले नाही.
– रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना

माळेगाव कारखान्याला स्वतःचे उसाचे कार्यक्षेत्र मोठे नसताना देखील कारखान्याची विस्तारवाढ करण्यात आली आहे. ज्या उद्दीष्टाने कारखान्याची विस्तार वाढ झाली हे उद्दिष्ट कुठेही साध्य होताना दिसत नाही. को-जनची देखील तीच अवस्था आहे. आजही कारखाना साडेसात हजार टनाच्यावर गाळप करू शकत नाही. याचा परिणाम ऊस उत्पादक सभासद व कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर होईल.
– बाळासाहेब तावरे, माजी अध्यक्ष माळेगाव कारखाना

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.