उच्च शिक्षणही महागणार?

तब्बल 30% शैक्षणिक शुल्कवाढीचा प्रस्ताव
अधिसभेत ठराव, विद्यार्थी विरोध करण्याच्या पवित्र्यात

पुणे – गेल्या चार-पाच वर्षांपासून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क वाढ करण्यास बंधने आली आहेत. त्यामुळे आता विद्यापीठानेच शुल्कवाढीसाठी पुढाकार घेत येत्या शैक्षणिक वर्षापासून पारपंरिक महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांच्या शिक्षण शुल्कात 30, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 20 टक्‍के वाढ करण्याचा प्रस्ताव अधिसभेत मांडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांनी शुल्क वाढ केली नसली, तरी ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत तब्बल 30 टक्‍के शुल्कवाढीच्या प्रस्तावास विद्यार्थ्यांमधून तीव्र विरोध होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शुल्कवाढीचा मुद्दा अधिसभेत गाजणार असल्याचे दिसून येत आहे.

येत्या शनिवारी होणाऱ्या अधिसभेत प्राचार्य प्रकाश पाटील शुल्कवाढीचा ठराव मांडला आहे. यापूर्वी महाविद्यालयांना शुल्क वाढ करण्याचा अधिकार होता. मात्र, त्यानंतर अनेक बंधने घालण्यात आली. त्याचा फटका महाविद्यालयाच्या आर्थिक नियोजनास बसत आहे. महागाई वाढत आहे. कर्मचारी व शिक्षकांचे वेतन वाढले आहे. वाढत्या खर्चामुळे महाविद्यालये चालवणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक शुल्कात वाढ केल्याशिवाय महाविद्यालयांपुढे पर्याय नाही. त्यादृष्टीने हा ठराव महत्त्वपूर्ण असल्याचे अधिसभा सदस्यांचे म्हणणे आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षापर्यंत पारंपरिक महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांची शिक्षण शुल्कात विद्यापीठ स्तरावर वाढ करून शुल्क निश्‍चित करण्याची मागणी प्राचार्य पाटील यांनी केली. शुल्क निश्‍चिती करताना प्राथमिक स्वरुपात अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 30, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 20 टक्‍के वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी ठरावात म्हटले आहे.

याच विषयावर प्राचार्य संजय खरात यांनी ठराव मांडला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 अंतर्गत शिक्षण शुल्क समिती नेमून शिक्षण शुल्क फेररचना करण्यात यावी, असे त्यांनी ठरावात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.