नवी दिल्ली – विद्यापीठातून सर्वांगीण विकास झालेल्या व्यक्ती घडाव्यात तसेच आपल्या मोठ्या लोकसंख्येच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी उच्च शिक्षणाचे स्वरूप बहुशाखीय असावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले. पुढील काही वर्षांमध्ये करियरच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रांचे व्यापक ज्ञान असणे आवश्यक असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
नायडू यांनी मुक्त कलांचे पुनरुज्जीवन आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) अभ्यासक्रमांबरोबर त्यांचे एकत्रीकरण करण्याचे आवाहन केले. विविध मूल्यांकनांमधून असे दिसून आले आहे की कला आणि सामाजिक शास्त्रांच्या ज्ञानामुळे सर्जनशीलता वाढते, विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता सुधारते, उच्च सामाजिक आणि नैतिक जागरूकता आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्तम सांघिक आणि संवाद कौशल्य वाढते.
21व्या शतकातील अर्थव्यवस्थेत, जिथे अर्थव्यवस्थेचे कोणतेही क्षेत्र एकट्याने काम करू शकत नाही तिथे अशा गुणांना अधिक मागणी आहे, असेही ते म्हणाले.
मानव्यशास्त्र संबंधी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अवगत करण्याचे महत्त्व नायडू यांनी अधोरेखित केले जेणेकरून ते त्यांच्या संशोधन विषयक अभ्यासात त्याचा अवलंब करू शकतील.
“केआरईए’ विद्यापीठात मानव्यशास्त्रातील प्रगत अभ्यासासाठी मोटुरी सत्यनारायण केंद्राचे उद्घाटन नायडू यांनी आभासी माध्यमातून कोले. भारतात प्राचीन काळापासून समग्र शिक्षणाची ‘परंपरा ‘ असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अशा समग्र शिक्षणाचे महत्त्व जाणून विविध शाखांमधील कठोर आणि कृत्रिम अडथळे मोडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.