दि.18 नोव्हेंबरपासून होणार अंमलबजावणी
ताशी 120 कि.मी.ची वेगमर्यादा आता 100
पुणे – महामार्गावरील वेगमर्यादा कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. सध्या ताशी 120 किलोमीटर असणारी वेगमर्यादा 100 करण्यात येणार असून, दि.18 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून “एक्स्प्रेस वे’, राष्ट्रीय महामार्ग, महानगरपालिका हद्दीतील रस्ते आणि अन्य रस्ते अशी वर्गवारी करून वेगमर्यादा निश्चित करण्यात येते. मंत्रालयाच्या सूचनेनुसार “एक्स्प्रेस वे’ वरील ताशी कमाल वेगमर्यादा 80 किलोमीटरवरून 120 किलोमीटर करण्यात आली होती.
मागील काही वर्षांतील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करत वेगाने वाहन चालवणे, लेन कटिंग या प्रमुख कारणांमुळे महामार्गांवर अपघात होतात. त्यामुळे वेगमर्यादा कमी करण्याची मागणी केली जात होती. महामार्ग पोलिसांकडून देखील याबाबत प्रयत्न करण्यात येत होते. अखेरीस अपघातांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता वेगमर्यादेलाच आवर घालण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने एक्स्प्रेस वेवरील वाहनांची वेग मर्यादा 120 ऐवजी 100 पर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता.
अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने दि.25 ऑक्टोबरला नवीन वेगमर्यादेसंदर्भातील परिपत्रक काढले असून, त्याची अंमलबजावणी दि.18 नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांमध्ये वेगमर्यादेबाबत जागृती केली जाणार आहे. त्यासाठी एक्स्प्रेस वे-सह महमार्गावर माहितीफलकही लावण्यात येणार आहे. त्यानंतर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.