हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणाचा बड्या पोलीस अधिकाऱ्यांना विळखा

– संजय कडू

पुणे – शहरात गाजत असलेल्या हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणात दररोज नवे ट्‌विस्ट येत आहेत. पोलीस मित्र जयेश कासटविरुद्ध खंडणीची तक्रार देणाऱ्याच मनोज अडसूळविरोधातच डॉक्‍टरकडे 1 कोटी 30 लाखाची खंडणी मागितल्याचा व प्रत्यक्षात 75 लाख घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर, अडसूळच्या डॉक्‍टर भावाने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर कासटला खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली.

दरम्यान, अडसूळ याने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जासोबत पेन ड्राइव्ह सादर केला आहे. यामध्ये पोलिसांचा “हसमुख’ मित्र कासटने अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस उपायुक्तांचा चुलत सासरा असलेला ज्येष्ठ पत्रकार आणि अन्य एका पत्रकाराच्या नावाने खंडणी मागितल्याचे कॉल रेकॉर्डिंग आहे.

कासटचे पोलिसांशी असलेले लागेबांधे लक्षात घेता, तो आणखी किती पोलीस अधिकाऱ्यांना अडचणीत आणू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी.

चोरावर मोर व्हायला गेला अन्‌ अलगद अडकला
मनोज अडसूळ याने जयेश कासटविरोधात 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा तक्रार अर्ज गुन्हे शाखेकडे दिला होता. यामध्ये कासटने पाच लाख रु. रोख स्वीकारले होते. दरम्यान, या तपासात मनोज अडसूळने डॉ. रासने यांच्याकडे खंडणी मागितल्याचे पुढे आले. यानुसार त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अडसूळने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यामध्ये त्याने “डॉ. रासने यांनी हातउसने घेतलेले पैसे परत मागितले’ असे सांगितले. तर डॉ. रासने यांच्याकडून घेतलेल्या 75 लाख रुपयांची माहिती झाल्याने जयेश कासट याने ब्लॅकमेलिंग करुन 25 लाखांची खंडणी मागितली. त्यातील पाच लाख घेतल्यावर उरलेल्या 20 लाखांसाठी त्याने तगादा लावला होता. तो सातत्याने अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त व दोघा पत्रकारांची नावे घेऊन धमकी देत होता. याचे मोबाइल रेकॉर्डिंग पेन ड्राइव्हमध्ये न्यायालयाला देण्यात आले आहे. यामुळे कासटने घेतलेल्या नावांचा प्रकरणात किती सहभाग आहे, की त्याने नावांचा वापर खंडणीसाठी केला, हे तपासातच स्पष्ट होणार आहे. त्याने डॉ. रासनेंकडून घेतलेले 75 लाख रुपये सर्वांमध्ये वाटून घ्यायचे असल्याचे सांगितले होते.

पापात भागीदार असलेल्यांचे काय?
कासट याचे औषधी दुकान असून, एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तो विविध शिबिरे राबवत होता. यातून पोलिसांसाठी शिबिरे राबवत असताना, त्याचे अनेक अधिकाऱ्यांशी संबंध आले. तोंडात साखर आणि अंगभूत व्यावसायिक गुणांचा वापर त्याने करून घेतला. अनेकप्रकरणे मध्यस्थीने तो सोडवू लागला. पोलीस आणि माध्यमे हाताशी असल्याच्या अविर्भावात तो होता. मागील काही दिवसांत त्याने एका पत्रकाराला “रितसर’ हाताशी धरून मध्यस्थी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, दुकानदारीची “लक्ष्मण’रेषा ओलांडताच त्याला अटक करण्यात आली. त्याच्या पापात भागीदार असलेल्यांचे काय? हा प्रश्‍न समोर येत आहे.

“सवलतीचे औषध’ कोणाकोणाला?
कासटचे अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींशी घरोब्याचे संबंध आहेत. तो अनेकदा पोलीस उपायुक्त झोन-2 कार्यालय आवारात दिसत होता. मागील काही महिन्यांत त्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयातील फेऱ्याही वाढल्या. तर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक प्रतिष्ठांसोबतची छायाचित्रे आहेत. यामुळे त्याच्या सहवासाचा लाभ घेतलेल्या व सवलतीत औषधे घेतलेल्या सगळ्यांनाच घाम फुटला आहे.

निरंतर सेवा पाण्यात…
कासटने मागील अनेक वर्षांपासून सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षणविषयक काम केले. या उपक्रमांचा अनेकांना लाभ झाला आहे. विशेषत: शालेय मुलांसाठी सायकलसह शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. तर पोलिसांसह अनेक घटकांसाठी वैद्यकीय कंपन्यांच्या मदतीने शिबिरे घेतली. गणेशोत्सवातही विश्रामबाग पोलीस ठाणे आवारात सुसज्ज तात्पुरता दवाखाना उभारला जात होता. त्याने समाजकार्यातून अचानक मध्यस्थीकडे “ट्रॅक’ वळवल्याने इतक्‍या वर्षांचे कार्य पाण्यात बुडाले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.