मुंबई – नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एकाएका करोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू ? त्यांचे अश्रू कसे पुसू ? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे सांगत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन पुढे जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत असे जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.
ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सूचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच यापुढे प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.