पुण्यातील मेट्राे मार्गााबाबत उच्च न्यायालयाचा माेठा आदेश

शिवाजीनगर-रामवाडी मेट्रो मार्गातील अडथळा दूरयेरवड्यातील जागा आली ताब्यात

पुणे – मेट्रो प्रकल्पातील शिवाजीनगर-रामवाडी मार्गावरील येरवडा येथील पाच हजार चौरस मीटर जागा महामेट्रोला देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहेत. या निर्णयामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर ते रामवाडी या मार्गिकेसाठीचा या भूसंपादनाचा अडथळा दूर झाला आहे.

 

शिवाजीनगर ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. कल्याणीनगरमधून येणाऱ्या मार्गिकेचे काम येरवड्याजवळ थांबले होते. येथील एका जागेवरून वाद सुरू असल्याने तो न्यायालयात प्रलंबित होता. ही जागा सरकारच्या मालकीची असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यावर खासगी व्यक्ती आणि संस्थांनी मालकीहक्क सांगितला होता. ही जागा मिळत नसल्याने येरवड्यातील पर्णकुटी चौकापर्यंतचे काम महामेट्रोला करता येत नव्हते.

 

या जागे अभावी नागरिकांच्या हिताच्या मेट्रोसारख्या प्रकल्पाला विलंब होत असल्याने ही जागा तातडीने उपलब्ध व्हावी, अशी विनंती महामेट्रोने उच्च न्यायालयाला केली होती. या जागेसंदर्भात दाखल याचिकाकर्त्यांनी मेट्रोला आवश्यक 5 हजार चौरस मीटरची जागा देण्याला कोणताही विरोध नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे महामेट्रोला आवश्यक जागा पुढील 15 दिवसांत हस्तांतरित केली जावी, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिले.

 

जागा ताब्यात नसल्याने या मार्गाचे 300 मीटरचे कामकाज बंद आहे. कल्याणीनगर ते येरवडा दरम्यानचा मार्ग जोडण्याचे काम थांबले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे ही अडचण दूर झाली असून येथे नऊ पिलर उभारण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाणार आहे, असे महामेट्रो महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डॉ. हेमंत सोनावणे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.