चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा याचिकेव्दारे आरोप
मुंबई : कर्जत जामखेडमधून पराभूत झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप राम शिंदें यांनी रोहित पवारांवर केला. याप्रकरणी रोहित पवारांना समन्स जारी करण्यात आले आहे.
राम शिंदेंच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने रोहित पवारांना समन्स बजावले आहे. राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मतदारांना पैसे वाटण्यासाठी रोहित पवार यांनी बारामती ऍग्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला. तसेच व्हॉट्सऍपवर अपप्रचार केला असल्याचा आरोप राम शिंदेंनी रोहीत पवार यांच्यावर लावले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या निवडणूक लढण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. कर्जत-जामखेडमधून दोनदा निवडून आलेले माजी आमदार राम शिंदे आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र पवार यांनी ही याचिका दाखल केली होती.
रोहित पवारांनी मतदारांना आमिष दाखवणे व अन्य गैरप्रकारांचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित केल्याचे या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयाने रोहित पवार यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 13 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर याचिकेवर सुनावणीदेखील होऊ शकते.