मुंबई : राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर 2,940 बेकायदा ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) लावण्यात आल्याचा तपशील सरकारी यंत्रणांनीच माहिती अधिकारांत याचिकाकर्त्यांना उपलब्ध केला होता. त्यामुळे या बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांना केली. तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
तीन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. शिंदे सरकार स्थापन झाल्यावर आंदोलन गुंडाळण्यात आले आहे. धार्मिक स्थळांवरील बेकायदा ध्वनिक्षेपकांवरील कारवाईबाबत उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2016 मध्ये आदेश दिले होते.
मात्र, या आदेशांचे पालन केले जात नसल्याचे नवी मुंबईतील रहिवासी संतोष पाचलाग यांनी अवमान याचिकेद्वारे निदर्शनास आणून दिले. तसेच, राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवर 2940 बेकायदा ध्वनिक्षेपक लावण्यात आल्याचा तपशील माहिती अधिकारांत देण्यात आल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले.