भाजपच्या माजी आमदाराची याचिका फेटाळली
नवी दिल्ली: जेएनयुतील आंदोलनाच्या अनुषंगाने विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यास दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने नकार दिला आहे. या सरकारला हा आदेश देण्यास आपण भाग पाडावे अशी दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आम्ही असा आदेश दिल्ली सरकारला देऊ शकत नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने भाजपचे माजी आमदार नंदकिशोर गर्ग यांची ही याचिका फेटाळून लावली. या याचिकमागे गर्ग यांचा काही तरी व्यक्तिगत हेतू असावा अशी टिपण्णीही कोर्टाने केली आहे.
कन्हैय्याकुमार, अनिर्बन भट्टाचार्य, उमर खलिद आणि अन्य विद्यार्थी नेत्यांच्या उपस्थितीत जेएनयु विद्यापीठातील 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या कार्यक्रमात देशाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. पण त्या खटल्यासाठी राज्य सरकारची अनुमती मिळालेली नाही त्यामुळे तो खटला चालवता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारला तसा आदेश हायकोर्टाने दिला पाहिजे अशी याचिकाकर्त्याची मागणी होती.