परदेशी महिलेला हायकोर्टाचा दिलासा

भारतातील मूळ पालक शोधण्यासाठी महिलेला माहिती द्या

मुंबई (प्रतिनिधी)– स्विस येथे राहणाऱ्या पण मुळ भारतात जन्म घेतलेल्या परदेशी महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आपले मूळ पालक शोधण्यासाठी संबंधित महिलेला पॉवर ऑफ अटोर्णीबद्दल माहिती द्या, असे आदेश राज्य सरकारच्या दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाला न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने दिले.

काही महिन्यांची असतानाच ऑगस्ट 1978 साली स्विस देशातील एका जोडप्याने तिचे पालकत्व स्वीकारले. याचिकाकरती आता 41 वर्षाची झाली असून भारतातील आपले मूळ पालकांचा शोध घेण्यासाठी 2013 साली केंद्राच्या दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाकडे धाव घेतली. त्यावेळी केंद्र सरकारने यात राज्य सरकारच्या दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाला लक्ष घालण्याचे आदेश दिले.

परंतू याचिकाकर्तीला तिथून कोणतीही माहिती न मिळाल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी काही अपवादात्मक प्रकरणामध्ये दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाला अशा प्रकारची माहिती पुरविण्याचे अधिकार आहेत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच सदर महिलेला राज्याच्या दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाकडे नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.