गुवाहाटी : बांगलादेशातील अशांततेनंतर आसाम आणि पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी बांगलादेशला लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. आसाममधील करीमगंज, कचार, धुबरी आणि दक्षिण सलमारा-मानकाचर या जिल्ह्यांची २६७.५ किमीची सीमा बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहे.
जिल्हा आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना वैयक्तिकरित्या सीमा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंसक अशांततेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. आसाम सरकार आसाममधील सुतारकांडी, मेघालयातील डावकी आणि त्रिपुरामधील अखौरा येथील एकात्मिक चेक पोस्ट्ससह बांगलादेश सीमेवर देखरेख करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीएसएफचे महासंचालक (कार्यवाहक) दलजित सिंग चौधरी आणि इतर वरिष्ठ कमांडर्सनी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालमधील काही सीमावर्ती भागांचा दौरा केला. पश्चिम बंगालची बांगलादेशशी एकूण २,२१७ किलोमीटरची सीमा आहे.