पुणे – शहरात करोनाच्या वाढत्या साथीमुळे शहराच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत असतानाच; करोना रुग्णांच्या दैनंदिन बाधितांच्या आकडेवारीबाबत महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शुक्रवार (दि.31 जुलै) दैनंदिन अहवालात महापालिकेने तब्बल 1 हजार 62 रुग्णांची माहितीच पालिकेने दैनंदिन अहवालात जाहीर केली नसल्याचे समोर आले आहे. तर त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाच्या अहवालात मात्र, पुण्यात सुमारे 1880 बाधित असल्याने नमूद केले होते. त्यामुळे महापालिकेने ही माहिती का लपविली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आकडेवारी कमी दाखवून महापालिकेचे अधिकारी करोना नियंत्रणात आल्याचा ढोल बडवित असल्यचे विदारक चित्र आहे.
शहरातील नागरिकांसाठी महापालिकेकडून दरारोज नव्याने करोनाबाधित रुग्ण तसेच शहरातील करोनाचा अहवाल जाहीर केला जातो, त्यात, नवीन बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, शहरात झालेले एकूण मृत्यू, दैनंदिन सर्वेक्षण याची माहिती देण्यात येते. शहरात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येण्याच्या एक दिवस आधी दि. 28 जुलैला 1213 रुग्ण सापडले तर त्यानंतर 29 जुलैला 1308 रुग्ण सापडले तर 30 जुलैला 1699 रुग्ण सापडले होते. तर 31 जुलैला हा आकडा थेट 50 टक्के घटल्याचे दाखवित शहरात अवघे 818 बाधित रुग्ण सापडल्याचा अहवाल पालिकेने जाहीर केला. पण, प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, त्या दिवशी तब्बल 1880 नवे बाधित सापडले होते. तर जिल्हा प्रशासनाची माहिती आयसीएमआरच्या संकेतस्थळावरूनच घेतलेली होती. असे असतानाही पालिकेने मात्र, आपल्या अहवालात सुमारे 1 हजार 64 रुग्ण कमी दाखविले. त्यामुळे रुग्ण कमी करण्यामागे पालिकेचा नेमका हेतू काय होता हे अद्याप अस्पष्टच आहे. तर महापालिकेने दैनंदिन एकूण रुग्णसंख्येच्या वाढीतही हा आकडा नमूद केलेला नाही.
माहिती उशिरा आल्याचे कारण?
अहवालातील आकडेवारीच्या गोंधळाचे खापर महापालिकेने पुन्हा खासगी लॅबवर फोडले आहे, खासगी लॅबने अहवालाची माहिती 31 जुलैला रात्री उशिरा पालिकेस कळविली, मात्र, त्या आधीच ती आयसीएमआरला देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आणि पालिकेच्या आकड्यात तफावत असल्याचा खुलासा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही त्या दिवशी केवळ ऍन्टीजेन टेस्टचा अहवाल दिला असून लॅबचा अहवाल मिळाला नसल्याने 1 हजार 64 रुग्नांची माहिती दिली नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.