प्रशासनात सुसूत्रता व नियंत्रण आणण्यासाठी हायटेक पाऊल
सातारा – सातारा पालिकेच्या 22 आस्थापनांच्या कक्षांमध्ये तब्बल 53 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून हे कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. नगरपालिकेच्या निधीतून या कामासाठी विद्युत विभागाला 17 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात सुसूत्रता व नियंत्रण आणण्यासाठी सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदेश राज्य शासनाने काढला होता. तीन वर्षापूर्वी पालिकेच्या दर्शनी भागात सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र, हे कॅमेरे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकले नाहीत. कॅमेऱ्यांचे रिझोल्युशन उच्च नसल्याने ते केवळ शो पीस बनले होते. सातारा पालिकेत मध्यंतरी ठरावांच्या फायली गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. बांधकाम विभागात अभियंते कमी व ठेकेदारांची जास्त गर्दी होत होती. आरोग्य विभाग व इतर काही विभागांचे काही कर्मचारी दुपारनंतर कार्यालयाकडे फिरकत नसत. सायंकाळी पावणेसहा वाजता बायोमेट्रिक नोंद होत नसतानाही हजेरी पत्रकावर शंभर टक्के हजेरी लावली जात होती.
या गोष्टींना चाप लावण्यासाठी विद्युत विभागाच्या माध्यमातून पालिकेच्या इमारतीत 53 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. मुख्याधिकारी कक्ष, पालिका इमारतीचा दर्शनी भाग, लेखा विभाग, सहाय्यक लेखा परीक्षण विभाग, गोडोली ऑफिस प्रत्येकी दोन, नगराध्यक्ष कक्षाबाहेर, आस्थापना विभाग, स्थावर जिंदगी विभाग, एनयूएलएम, निवडणूक कक्ष, वृक्ष विभाग, कमिटी हाऊस, महिला व बालकल्याण समिती, विरोधी पक्ष नेता केबिन, नियोजन समिती, मागासवर्गीय कल्याण समिती प्रत्येकी एक, छत्रपती शिवाजी सभागृहाच्या गॅलरीत सहा, नगररचना व अतिक्रमण विभाग, आरोग्य सभापती व विभाग, विद्युत विभाग व दर्शनी भाग, वसुली विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, भांडार , सदरबझार ऑफिस, राजवाडा ऑफिस प्रत्येकी तीन, बांधकाम विभाग चार, असे एकूण 53 कॅमेरे बसविले जाण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पालिकेच्या मुख्य कार्यालयाबरोबरच सबर्बन पालिका कार्यालय व राजवाडा येथील कार्यालयावरही सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवणे मुख्याधिकाऱ्यांना शक्य होणार आहे. पालिकेतल्या दांडी बहाद्दरांना चाप लावणे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शक्य होणार आहे.