अशी असणार नंबर प्लेटची प्रक्रिया
एक एप्रिलनंतर तयार होणाऱ्या वाहनांवर या वाहनांच्या निर्मात्या वाहन कंपनीकडूनच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवण्यात येणार आहे. नव्याने येणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन आरटीओकडून केले जाणार आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर शोरुमच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाने दिलेला नंबर वाहन उत्पादक कंपनीला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कंपनीकडून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तयार करून वाहनांना लावण्यात येणार आहे.
पिंपरी – चुकीच्या नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे टाळण्यासाठी तसेच देशामध्ये एकाच प्रकारची युनिक नंबर प्लेट असावी या उद्देशाने केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पासून करण्यात येत आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आणि उपप्रादेशिक कार्यालयाला प्रतिक्षा असलेली एकही नंबर प्लेट लावण्यात आलेली नाही.
या नंबर प्लेटचे “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ असे नामांकन करण्यात आले असून वाहन उत्पादक कंपनीच यापुढे वाहनांसाठी या नंबर प्लेट उपलब्ध करून देणार आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन वाहन उत्पादक कंपन्यांना बसवून देणे 1 एप्रिल पासून अनिवार्य केले आहे. ही नंबर प्लेट एकदा बसवल्यावर परत कुणालाही तयार करता येणार नाही. त्यामुळे वाहनांवर दिसणाऱ्या फॅशनेबल नंबर प्लेटला आता चाप बसणार आहे. मात्र, वाहन उत्पादक कंपन्यांना या नंबर प्लेटच्या निर्मितीसाठी लागणारी साधन सामग्री, कामगारांची कमतरता आहे.
तसेच बाजारात सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेलेली वाहने ही 31 मार्चपुर्वी बनविण्यात आलेलीच आहेत. 1 एप्रिलनंतर निर्मिती करण्यात आलेल्या वाहनांवर नव्या पद्धतीच्या नंबरप्लेट या कंपनीकडून तयार करून देण्यात येणार आहेत. या नंबरप्लेटमुळे गाड्यांच्या नंबरबाबत पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. नंबरमध्ये कोणताही बनावटीपणा करता येणार नसल्याने वाहनचोरी, चैन स्नॅचिंग, अपघातग्रस्त गाड्या, प्लेटमधील करण्यात येणारे बदल या बाबींना आळा बसणार आहे, अशी माहिती उपप्रासेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली.