पिंपरी – चुकीच्या नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे टाळण्यासाठी तसेच देशामध्ये एकाच प्रकारची युनिक नंबर प्लेट असावी या उद्देशाने केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पासून करण्यात येत आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आणि उपप्रादेशिक कार्यालयाला प्रतिक्षा असलेली एकही नंबर प्लेट लावण्यात आलेली नाही.
या नंबर प्लेटचे “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ असे नामांकन करण्यात आले असून वाहन उत्पादक कंपनीच यापुढे वाहनांसाठी या नंबर प्लेट उपलब्ध करून देणार आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन वाहन उत्पादक कंपन्यांना बसवून देणे 1 एप्रिलपासून अनिवार्य केले आहे. ही नंबर प्लेट एकदा बसवल्यावर परत कुणालाही तयार करता येणार नाही. त्यामुळे वाहनांवर दिसणाऱ्या फॅशनेबल नंबर प्लेटला आता चाप बसणार आहे.