जम्मू : हिज्बुल मुजाहिदीनच्या खतरनाक दहशतवाद्याचा आज सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये खात्मा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात झालेल्या या चकमकीदरम्यान या दहशतवाद्याचा एक साथीदार मात्र निसटून पळून जाण्यात यशस्वी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोडा जिल्ह्यातील गोंडाना पट्टयामध्ये ही चकमक झाली. या भागात दहशतवादी असल्याबद्दलची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती, असे जम्मू विभागाचे संरक्षन विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंत कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले. यावेळी चकमकीदरम्यान हिज्बुल मुजाहिदीनचा हरून वाणी हा “ए ++’ श्रेणीतील दहशतवादी मारला गेला.
तो गताह पट्टयातील रहिवासी होता, असे दोडा-किश्तवाडचे पोलिस महानिरीक्षक सुजीत कुमार यांनी सांगितले. या चकमकीदरम्यान आणखी एक दहशतवादी तीव्र हिमवर्षाव झालेल्या भागात पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याला शोधण्याची मोहिम सुरू आहे. ठार झालेल्या हरून वाणी याच्याकडून एके-47 रायफल, 3 मॅगझीन, 73 राऊंड काडतुसे, चीनी ग्रेनेड आणि रेडिओ सेट ताब्यात घेण्यात आला आहे.