किश्‍तवाडमध्ये हिज्बुलच्या दहशतवाद्याला अटक

जम्मू – हिज्बुल ए मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला आज जम्मू काश्‍मीरच्या किश्‍तवाड जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तब्बल 19 वर्षे तो फरार होता, असे पोलिसांनी सांगितले.

दुल्ला उर्फ जमील असे या माजी दहशतवाद्याचे नाव असून तो रायसी भागातील अरनास गावचा रहिवासी आहे. तो हिज्बुल ए मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा माजी दहशतवादी असून गेल्या 11 दिवसात अटक करण्यात आलेला तो तिसरा माजी आणि फरार दहशतवादी आहे.

गुप्तचरांना मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने काही संशयास्पद ठिकाणांवर छापे घातले होते. या कारवाईमध्ये दुल्ला याला अटक करण्यात आली. दुल्ला सध्या छत्रू बागातील कुंदवार गावात रहात होता. दहशतवादी कारवायांबद्दल दुल्ला याच्यावर 2002 मध्ये छत्रू गावात एक गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून तो फरार होता. अटक करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

यापूर्वी बुधार बोजवान येथील नाझिर अहमद आणि अब्दुल गनी उर्फ माविया या दोन फरार दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. यातील नाझिर हा 12 वर्षांपासून फरार होता. त्याला 12 सप्टेंबर रोजी अटक केली गेली. तर गनी हा 19 वर्षांपासून फरार होता. त्याला 17 स्पटेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.