चोरीच्या पैशातून खरेदी केलेली गाडी, दोन सदनिका आणि दागिने जप्त
पुणे – पाच वर्षापूर्वी झालेल्या 50 लाख रुपयांच्या घरफोडीची उकल नाट्यमयरित्या झाली आहे. विशेष म्हणजे गुन्हयातील एक चोरटा दुसऱ्यांदा संबंधीत घरात चोरी करायला गेला असताना रंगेहाथ पकडला गेला. त्याने पाच वर्षापूर्वी संबंधीत घरात 50 लाखाची चोरी केल्याचे सांगितले. मात्र फिर्यादीने तेव्हा केवळ पाच लाखाचीच चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. दुसऱ्यांदा हा चोरटा पकडल्यानंतरही फिर्यादीने ही माहिती पोलिसांना दिली नाही. मात्र चोरट्यांनीच 50 लाखाची चोरी केल्याचे वारंवार सांगितल्याने पोलिसांनी फिर्यादीची चौकशी केली. यावेळी फिर्यादीने पत्नीला धक्का बसेल म्हणून 50 ऐवजी पाच लाखाचीच फिर्याद नोंदवल्याचे सांगितले. दरम्यान चोरीच्या पैशातून दोघा चोरट्यांनी दोन सदनिका, चारचाकी गाडी आणि दागिने खरेदी केले होते. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रभात रस्त्यावर 30 जूलै रोजी एक चोरटा सकाळी चाकू घेऊन एका सदनिकेच्या गॅलरीत घुसला होता. तेथे रहाणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला करुन त्याने जबरी चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिकांनी आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सोमनाथ बंडू बनसोडे (47, रा.दिलीप बराटे यांच्या बंगल्याजवळ, रामनगर, वारजे माळवाडी) असे संबंधीत आरोपीचे नाव होते. त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने त्याच घरात 2015 मध्ये चुलत भाऊ सुधाकर मुरलीधर बनसोडे (37, रा. समृध्दी कॉलनी, मांजरी बुद्रुक) याच्या मदतीने 50 लाख रुपये व सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता त्याच्या विरुध्द डेक्कन पोलिस ठाण्यात नोव्हेंबर 2015 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसले. या गुन्हयात चोरलेले चार लाख रोख व 1 लाख रुपयांचे दागिने चोरिस गेलेले आढळले. मात्र आरोपी स्वत: 50 लाखाची चोरी केल्याचे सांगत होता. यामुळे दुसऱ्या आरोपीस अटक केल्यावर त्याच्याकडेही चौकशी करण्यात आली. त्यानेही 50 लाखाची चोरी केल्याचे कबुल केले. यामुळे अखेर पोलिसांनी फिर्यादीकडे चौकशी करायचे ठरवले.
फिर्यादीने 50 लाख रुपये चोरीला गेले होते, मात्र मी खरी रक्कम सांगितली असती तर पत्नीला मानसिक धक्का बसला असता म्हणून पाच लाखाचीच फिर्याद दिल्याचे सांगितले. यामुळे 2015 च्या गुन्हयाचा फेरतपास सहायक पोलिस निरीक्षक सविता भागवत यांच्याकडे देण्यात आला. यातपासात सुधाकर बनसोडेला 50 लाखा पैकी 28 लाख रुपये मिळाले होते. त्या रकमेतून त्याने मांजरी बुद्रुक येथे 1 गुंडा जागेत 800 चौ.फुटाचे बांधकाम 20 लाखाला घेतले. तर एक रेनॉल्ट क्वीड गाडी 5 लाख 50 हजाराला घेतली. तसेच एक हिरो कंपनीची दुचाकी 80 हजाराला घेतली.
तसेच चोरीत मिळालेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी काही दागिने एका पतसंस्थेत तारण ठेऊन कर्ज घेतल्याचे सांगितले. दुसरा आरोपी सोमनाथ बनसोडे याने चोरीत 22 लाख मिळाल्याचे सांगत रोख रकमेतून भूगाव येथे एक वन बीएके सदनिका घेऊन फर्निचर, ग्रील अशी कामे केली. तर सोन्याचे दागिने मोडल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींची चोरीच्या पैशातून खरेदी केलेली दोन घरे, कार व दुचाकी असा 50 लाखाचा ऐवज आणि तारण ठेवलेले व मोडलेले सोन्याचे दागिने असा 12 लाख 95 हजाराचा ऐवज असा दोन्ही मिळून 62 लाख 95 हजाराचा ऐवज पाच वर्षानंतर हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड, पोलिस निरीक्षक राजू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाकाली सहायक पोलिस निरीक्षक सविता भागवत, सहायक पोलिस फौजदार हरीश्चंद्र केंजळे, पोलिस कर्मचारी संजय शिंदे, धोंडोपंत पांचाळ, विजर चिरमे, सचिन चव्हाण, बाळासाहेब भांगले, प्रविण कांचन यांच्या पथकाने केली.