पणजी : गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसला आहे. कोकणातील विविध गावांत भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर या भूस्खलनाचा रेल्वेलाही फटका बसला आहे. गोव्यामध्ये मंगळुरूकडून मुंबईकडे येणाऱ्या एका ट्रेनवरच दरड कोसळली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली ही गाडी सापडली आहे.
कर्नाटकमधील मंगळुरू येथून मुंबईकडे येणारी ही गाडी शुक्रवारी अपघातग्रस्त झाली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. रेल्वे रुळावरून उतरण्याची ही घटना दुधसागर-सोनोलिम विभागात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Landslide n derailment of train No. 01134 between sonarlim & Dudhsagar Goa at Km 39/800 No injury/casualties reported pic.twitter.com/kDNvUKa1jw
— Sheetal (@SheetuKumar5) July 23, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रेनची ओळख ०११३४ मंगळुरू जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या रूपात झाली आहे. विशेष बाब म्हणजे चिपळूण येथे आलेल्या पुरामुळे या रेल्वेच्या मार्गात बदल करून ती मडगाव-मिरजमार्गे वळवण्यात आली होती. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना कुलेम येथे माघारी धाडण्यात आले आहे. दुधसागर आणि सोनोलिम स्टेशनदरम्यान आणि करंजोल व दुधसागर स्टेशनदरम्यान दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी डिव्हिजनच्या घाट विभागात दोन ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. सध्या या भागात वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
याशिवाय ०२७८० हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा एक्स्प्रेसचासुद्धा रद्द झालेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. बुधवारी दिल्ली येथून मार्गस्थ झालेल्या या ट्रेनला लौंडा आणि वास्कोदरम्यान अंशत: रद्द करण्यात आले आहे. तसेच ट्रेन नंबर ०८०४८ वास्को द गामा-हावडा एक्स्प्रेस, ०७४२० वास्को द गामा-तिरुपती एक्स्प्रेस आणि ०७४२०/७०२२ वास्को द गामा तिरुपती हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.