मुंबई – ‘अरुण गवळी’ ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत नवरात्रीतल्या नवमीला एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. विशेष म्हणजे हा चेहरा अरुण गवळी यांच्या चेहऱ्या सारखा होता.
तीच रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्या वेळी काही लोकांनी त्यांना निरखून पाहिले असता ‘डॅडीं’च्या वेशात चक्क मराठी अभिनेते ‘मकरंद देशपांडे’ होते. विशेष म्हणजे मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द ‘डॅडी’ असल्याचाच भास सर्वांना झाला होता.
दरम्यान, यावेळी मकरंद यांचे दगडी चाळीत जाण्याचे खरं तर खास निमित्त होते. तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, 2020 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘दगडी चाळ 2’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. ‘दगडी चाळ 2’ मध्ये पुन्हा अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे. तर या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना चित्रपटात तोच दरारा पाहायला मिळणार आहे.