भुज – गुजरातच्या मुंद्रा बंदरावर तब्बल 15 हजार कोटी रूपयांच्या हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. ती कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केली. संबंधित प्रकरणी तामीळनाडूची राजधानी चेन्नईतून एका दाम्पत्याला अटक करण्यात आली.
अफगाणिस्तानमधून अंमली पदार्थांचा साठा पाठवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती काही दिवसांपूर्वी डीआरआयला मिळाली. त्यानंतर मुंद्रा बंदरावर दोन संशयास्पद कंटेनर जप्त करण्यात आले. कंटेनरमध्ये पूर्ण प्रक्रिया न झालेल्या आणि चेहऱ्याला लावण्याच्या टॅल्कम पावडरचे खडे असल्याचे सांगण्यात आले होते. त्या साठ्याचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातून संबंधित साठा हेरॉईन असल्याचे उघड झाले. दोन्ही कंटेनरमध्ये मिळून सुमारे 3 हजार किलो हेरॉईन ठेवण्यात आले होते.
इराणमधील बंदरातून संबंधित साठा मुंद्रा बंदरावर पाठवण्यात आला. आंध्रप्रदेशच्या विजयवाडामध्ये नोंदणी झालेल्या कंपनीने तो साठा आयात केला होता. संबंधित कंपनी एम.सुधाकर आणि दुर्गा वैशाली या दाम्पत्याकडून चालवली जाते. त्या दाम्पत्याला नुकतेच चेन्नईतून ताब्यात घेण्यात आले.
संबंधित प्रकरणी गुजरातमधील काही ठिकाणांबरोबरच दिल्ली आणि चेन्नईतही छापे टाकण्यात आले. अंमली पदार्थांच्या तस्करीत काही अफगाण नागरिक सामील असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासातून पुढे आली आहे.