जाणून घ्या निर्देशांक कोसळण्याची 5 कारणे…

मुंबई – सोमवारी शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक सव्वा दोन टक्‍क्‍यांनी कोसळले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. निर्देशांक कोसळण्याबाबत विश्‍लेषकांनी सांगितले की, याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

पहिली बाब म्हणजे अनेक जण ओरड करत असूनही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढले आहेत. रिझर्व बॅंकेने निर्देशांक विकास दरापेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र तरीही गुंतवणूक होऊन निर्देशांक वाढले होते. या पातळीवर निर्देशांक स्थिर राहण्याची शक्‍यता कमी म्हटल्यामुळे विक्रीचा जोर वाढला.

शेअर बाजारातील विक्रीचे आणखी एक कारण म्हणजे भारतामध्ये आणि जगातील काही महत्त्वाच्या देशांमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात अंशत: लॉक डाऊन सुरू होत आहे. त्याचा वाहतुकीवर व उद्योग-व्यवसायावर परिणाम संभवतो असे वाटल्यामुळे गुंतवणूकदार विक्री करीत आहे.

निर्देशांक उजळण्याचे तिसरे कारण म्हणजे गेल्या दोन आठवड्यापासून विविध कारणांमुळे क्रुडचे दर वाढत आहेत. तेल उत्पादक देशांनी नफा वाढविण्यासाठी तेल उत्पादन कमी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तेलाचे दर वाढत असतानाच अमेरिकेत टेक्‍सास या क्रुड उत्पादक राज्यांमध्ये थंडीची लाट आल्यामुळे उत्पादन कमी झाले. त्यामुळे आता क्रुडचे दर 62 डॉलर प्रति पिंपावर गेले आहेत. भारत क्रुडची जास्त प्रमाणात आयात करीत असल्यामुळे या महाग क्रुडचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटते.

सरकारच्या कर्जरोखे यावरील परतावा कमी असल्यानंतर शेअर बाजारात तेजी असते. मात्र गेल्या आठवड्यात अमेरिका आणि भारतासह विविध देशाच्या कर्ज रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे हे गुंतवणूकदार शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत, हे निर्देशांक कोसळण्याचे चौथे कारण आहे.

घसरणीचे पाचवे कारण म्हणजे अशा परिस्थितीत निर्देशांकाचे भवितव्य अस्थिर असल्यामुळे फ्युचर व ऑप्शनचे या महिन्याचे कॉन्ट्रॅक्‍ट गुरुवारी संपण्याअगोदर गुंतवणूकदार नका काढून घेत असल्याचे काही विश्‍लेषकांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.