“तिचे’ अस्तित्व इथे कायम धोक्‍यातच

आजही स्त्री सुरक्षित नाही. अधूनमधून घडणाऱ्या घटनांनी तिच्या असुरक्षिततेची प्रचिती अधोरेखित होत राहते. परंतु, घटना घडली की चर्चा होते. काही दिवसांनंतर सारे विसरून जातात. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. माण तालुक्‍यातील घटनेने अत्याचाराचा कळस गाठला. ही घटना वाचल्यानंतर अक्षरशः मन गोठून जाण्यासारखी अवस्था होऊन जाते. नराधमाला पोलिस यंत्रणा ताब्यात घेईलही. सोपस्कार पार पडून कारवाई होईलही. मात्र, समाजातील ही विकृती ठेचून काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचीच गरज आहे.

माण तालुक्‍यातील घटना सर्वांनाच सुन्न करून गेली. दहा वर्षांच्या शालेय मुलीवर नराधमाने अत्याचार केला. पीडित मुलीसमवेत तिची धाकटी बहिण व भाऊ असताना दमदाटी करीत त्याने हे कृत्य केले. ही घटना हादरवून टाकणारी आणि लाजीरवाणी तर आहेच. प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण करणारी आहे. जिने अजून जगही पुरेसे पाहिले नाही, तिच्या वाट्याला असा प्रसंग यावा, हे केवळ दुर्दैवच नाही तर आपल्या समाजव्यवस्थेबद्दल चीड निर्माण करणारे आहे. तिच्या मानसिकतेची कल्पनाही करता येणार नाही. शरीरावरचे घाव बरे होतील कदाचित, पण मनाच्या जखमांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. कळी उमलण्यापूर्वीच खुडण्याची मानसिकता मुळापासून उखडण्यासाठी आता समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे.

ग्रामीण भागात शिक्षणासाठी काही किलोमीटर अंतरावर चालत जावे लागते. या अशा रस्त्यांवर अनेक ठिकाणी विकृतीने ग्रासलेली मने दबा धरून उभी असतात. त्यांना ना वयाचा विचार असतो, ना कुणाच्या मनाचा. त्यामुळे आपल्या भावंडांसमवेत शाळेतून घरी जाताना या चिमुरडीला या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. या वेळी या नराधमाने क्रूरतेची सीमा गाठली. शाळेतून घरी चाललेल्या या तिघा भावंडांना मध्ये रस्त्यातच गाठून तुम्हाला घरी सोडतो, असे म्हणत मोटारसायकलवर बसविले. निर्जन स्थळी जाऊन लहान भावंडांना दमदाटी व मारहाण करीत त्याने त्या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले. मानवतेला काळिमा फासणारे कृत्य या नराधमाने केले. रस्त्यावर लोक असू शकतात, या कृत्याचे परिणाम काय होतील, असली कोणतीही तमा न बाळगता या हैवानाने अजाण बालिकेचे विश्‍व उद्‌ध्वस्त केले.

खरं म्हणजे शाळा, महाविद्यालयांचा परिसर अशा मुली, महिलांसाठी धोक्‍याचा बनू लागला आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. अशा परिसरातील रस्त्यावर असे प्रकार घडू नयेत म्हणून समाज व पोलिस यंत्रणा खरोखरच काही उपाय करते की नाही, अशी शंका या घटनेमुळे उपस्थित झाली आहे. असे काही खटकले तर त्याला हटकण्यासाठी कोणी पुढे येत नाही, ही वस्तुस्थिती समाजाची संवदनशीलता बोथट झाल्याचे स्पष्ट करणारी आहे. पोलिसांची पथके व इतर उपाय जाहीर होतात. त्याच्या अंमलबजावणीतही त्रुटी असतात, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. अत्याचारानंतर नराधम पळून जाऊ शकतो. त्याला पकडल्यानंतर कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्‍यक पुरावे आणि इतर बाबींची पूर्तता व्यवस्थित व्हायला हवी.

जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह विविध स्तरावर महिला अधिकारी कार्यरत आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आता योग्य दिशेने जाण्याची आवश्‍यकता आहे. या घटनेतील नराधमावर कठोर कारवाई होईल, यासाठी जिल्हा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा केली तर ती चुकीची ठरू नये. या मुलीच्या पुनवर्सनासाठी काही होणार की नाही, कायमस्वरूपी उपायांसाठी प्रशासन काही करणार की नाही व समाजमन संवदेनशीलता जपणार की नाही, हे प्रश्‍न उरणारच आहेत.

स्त्री अत्याचाराच्या घटना कुठे ना कुठे घडत असतात. परंतु ती घटना कुठे घडते, त्यावर त्याचे गांभीर्य वाढते. ही स्थितीसुद्धा लाज आणणारी आहे. दिल्ली किंवा मुंबईत अशी घटना घडली तर सारा देश खवळून उठतो. ग्रामीण भागातील घटनेचे गांभीर्य तेवढ्या संवेदनशीलतेने घेतले जात नाही. स्त्री कुठलीही असली तरी तिच्यावरील अत्याचाराचे परिणाम सारखेच असतात. मुळात अशी घटना घडू नये, यासाठी समाजाने तत्पर राहिले पाहिजे. पोलिस यंत्रणेनेही नेहमीच सतर्क असले पाहिजे. तरच तिच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याची कुणी हिंमत करणार नाही. नाही तर “ति’चे अस्तित्व इथे कायम धोक्‍यातच असेल, अशी स्थिती कायम राहिल. मानवतेच्या भूमिकेतून ही स्थिती बदलण्यासाठीच प्रशासन आणि समाजाने कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.