सभागृहनेतेपदी धीरज घाटे यांची नियुक्ती
पुणे – महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक हेमंत रासने यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, तर सभागृह नेतेपदी धीरज घाटे यांची निवड झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष आमदार सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन नगरसेवकांना पदांवर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी पक्षाने ठरवलेल्या धोरणानुसार हे बदल केल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे हे आमदार झाल्याने भाजपने त्यांना स्थायी समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. तसेच पीएमपीएमएल संचालक पदाची निवड आगामी मुख्यसभेत होणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
नव्यांना संधी देण्याचा निर्णय
धीरज घाटे हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. ते भाजपच्या प्रदेश कार्यकरिणीतीत चिटणीस आहेत. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, तेथे नव्या नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी पीएमपीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे मोहोळ म्हणाले.
विद्यमान पदाधिकाऱ्यांचे काम चांगले
महापालिका चालवण्यासाठी अनुभव आणि पक्षातील काम पाहून संधी दिली जाते. सुनील कांबळे यांनी यापूर्वीच्या अध्यक्षांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाची व्यवस्थित अंमलबजावणी केली आहे. तर, भिमाले यांनीही त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केले असून, शहराच्या विकासाच्यादृष्टीने सभागृहातील वातावरण एकोप्याचे राहील, यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केल्याचे मोहोळांनी नमूद केले.
रासने यांची निवड निश्चित
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर होईल. त्यानंतर अर्ज दाखल करून अध्यक्षपदाचा निर्णय होणार आहे. मात्र, महापालिकेत भाजपचीच एकहाती सत्ता असल्याने हेमंत रासने हेच अध्यक्ष होणार हे निश्चितच आहे. तरीही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. रासने हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. यापूर्वी ते एकदा स्वीकृत सदस्यदेखील होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या “सुवर्णयुग मंडळा’चे अध्यक्ष आहेत. सुवर्णयुग सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.