गुंड हेमंत पुजारीच्या नावाने खंडणी मागणारा जाळ्यात

हॉटेल व्यवस्थापकाकडे दरमहा मागितली होती 50 हजारांची खंडणी

गोळीबार करण्याची दिली होती धमकी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – कुख्यात गुंड हेमंत पुजारीचे नाव सांगून पुण्यातील एका हॉटेल व्यवस्थापकास दरमहा 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास खंडणीविरोधी पथकाने अटक केली. खंडणी दिली नाही, तर हॉटेलमध्ये येऊन गोळीबार करू, अशी धमकीही त्याने दिली होती. त्याने हॉटेलचा नंबर जस्ट डायलवरून मिळवला होता.

चार्लस उर्फ देवराज जेम्स थापा (27, रा. बी. टी. कवडे रोड, मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश जयशंकर शुक्‍ला (28, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी शुक्‍ला हे बंडगार्डन परिसरातील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. काही दिवसापूर्वी त्यांच्या हॉटेलमधील फोनवर एका मोबाइल क्रमांकावरुन कॉल आला होता. त्या व्यक्तीने गुंड हेमंत पुजारी टोळीचे नाव घेत “प्रोटेक्‍शन मनी’ म्हणून दरमहा 50 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच खंडणी दिली नाही, तर हॉटेलमध्ये येऊन गोळीबार करून ठार करण्याची धमकी दिली. याप्रकारानंतर शुक्‍ला यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दाखल केली.

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने फिर्यादींना आलेल्या कॉल डिटेल्सवरून आरोपीचा शोध सुरू केला. सदर क्रमांक देवराज थापा हा व्यक्ती वापरत असल्याचे निदर्शनास आले. तो बाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे पोलीस हवालदार प्रमोद मगर आणि धीरज भोर यांना समजले. त्यानुसार पथकाने चार्लस उर्फ देवराज थापा यास गुरूवारी सायंकाळी ताब्यात घेतले. सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी अविनाश मराठे, भाऊसाहेब कोंढरे, रमेश गरूड, उदय काळभोर, महेश कदम, संतोष मते, फिरोज बागवान आणि शिवानंद बोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यापूर्वीही दाखल आहे गुन्हा

चार्लस्‌ देवराज थापा याने सन 2014 मध्येही एका हॉटेल व्यवसायिकाकडे 1 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. यावेळी त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्याने हेमंत पुजारीच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. थापा हा एका हॉटेलमध्ये कुकचे काम करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)