क्रीडा क्षेत्रातून सामाजिक जाणीव जपणाऱ्या ‘हेमलता भोपे’

लहानपणापासूनच खेळाची आवड असणाऱ्या आणि त्यातूनच पुढे सामाजिक कार्याची गुढी उभारणाऱ्या सौ. हेमलता अनिल भोपे यांची “नवदुर्गां’च्या माध्यमातून ओळख करून देताना एका वेगळ्या अस्मितेला दिशा आणि दृष्टी मिळाली आहे. महाळुंगे इंगळेच्या सूनबाई सौ. हेमलता भोपे म्हणजेच राजगुरूनगरच्या सुभाष राजाराम ताजवे यांच्या कन्या यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यात वेगवेगळ्या भूमिकांमधून काम केले आहे.

प्रत्येक स्त्रीला तिची ऊर्मी, ऊर्जा एका यशस्वी पाऊलवाटेकडे घेऊन जात असते. सौ. हेमलता यांचे जीवनकार्यही असेच यशस्वी आणि उन्नत आहे. लहानपणापासूनच क्रीडा या क्षेत्राकडे त्यांचा विशेष कल आहे. राजगुरूनगर येथे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात दहावीपर्यंतचे झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षीच धावण्याच्या शर्यतीतला त्यांचा सहभाग त्यांच्या बालजीवनाला स्पर्धांची जाणीव करून देणारा होता. त्यात मिळवलेला प्रथम क्रमांक त्यांना यशाची चाहुल देऊन गेला. प्राथमिक शाळेत लंगडी, खो-खो, धावणे आदी स्पर्धांमधील त्यांचा सहभाग हा आवर्जून असायचा. शाळेत असतानाच क्रिकेटची आवड निर्माण झाली, शाळेत टीमच्या कर्णधार म्हणून त्यांनी नेतृत्वही केले.

शिवनेरीचा परिसर आणि राजगुरूंची जन्मभूमी ही या भागातील महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळेच शिवज्योत चाकणमधून आणण्याचा मानही त्यांना आठवीत असतानाच मिळाला. ही ज्योत पेलणे आणि तो मान एका स्त्रीला मिळणे हाच खरा त्यांचा सन्मान आहे. मोटारसायकलवर खेड आणि इतर परिसरातील पर्यटन-धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. आपण कुठेही मागे राहता कामा नये, याच शिकवणीचा वारसा त्यांना त्यांच्या माहेरच्या घरातून मिळाला. लौकिक अर्थाने महाविद्यालयीन शिक्षण त्यांना घेता आले नाही.

मात्र, आईला घरकामात मदत करताना संसारिक धडे गिरवताना सामाजिक कार्याचीही जाणीव होत गेली. 11 फेब्रुवारी 2001 ला अनिल बाळासाहेब भोपे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालत असताना त्यांनी त्यांच्या सहवासात आपल्या आवडीनिवडी जपायला सुरुवात केली. त्याला भोपे कुटुंबीयांनीही प्रोत्साहनच दिले. सौ. हेमलाता यांना दोन अपत्ये आहेत. इशा आठवीत असून, तिचे बुद्धिबळ खेळात प्रावीण्य आहे. जिल्हा पातळीवर तिला प्रमाणपत्र मिळाले आहे. रोहनला शूटिंगमध्ये रस असल्याने त्याच्या करिअरकडे त्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जात आहे.

महाळुंगे इंगळे येथे बचत गटाच्या माध्यमातून सौ. हेमलता यांचे कार्य बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. या माध्यमातून महिलांना सरकारच्या नवनवीन योजनांची माहिती देणे, त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देणे, योजनांमध्ये सहभागी करून देणे, त्यांचे अर्ज संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचवणे ही कामे सुरू आहेत.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात पोलिसांना वेळेवर नाष्टा-जेवण नेऊन देणे, त्यांच्याही आरोग्याची काळजी बचत गटाच्या माध्यमातून घेण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. मास्कवाटप, अन्नदान या त्यांच्या कार्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेक गरीब कुटुंबांना त्यांची मदत झाली आहे. आताही या भागातील महिलांना पिठाच्या गिरण्या, शिलाई मशीन मिळवून देऊन त्यांचे अर्थाजन वाढावे, यासाठी त्या सक्रीय आहेत.

सौ. हेमलता यांनी महाळुंगेमध्ये महिला मंडळाच्या माध्यमातून नवरात्रौत्सवासारख्या सणांमध्ये दांडिया, पैठणी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, डान्स, विविध गुणदर्शन अशा स्पर्धांचे आयोजन करून महिलांना प्रोत्साहन दिले आहे. या कार्यक्रमांवेळी विशेष मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचे कार्यक्रमही घेण्यात आले आहेत. शालेय जीवनापासूनच सौ. हेमलता यांना जीवन जगण्याची कला त्यांच्या घरातूनच शिकवली गेली. क्रीडा क्षेत्रातच त्यांनी आपला उमेदीचा काळ घालवला असल्याने चपळाई आणि समोर येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवण्याचे त्यांचे कौशल्य हे उल्लेखनीयच ठरते आहे.

– शब्दांकन: राजेंद्र सुरसे, महाळुंगे इंगळे, ता. खेड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.