‘हेमा मालिनी’च्या किस्स्याने हास्यकल्लोळ!

डॉ. सतीश देसाईंनी खास शैलीत उलगडले आयुष्यातील किस्से

तळेगाव दाभाडे -“पुणे फेस्टिव्हल’ आणि “ड्रीम गर्ल’ हेमामालिनी हे एक समीकरण होते. या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होणार होते. पण हेमामालिनी पुण्यात असल्याने त्यांनाही उद्‌घाटनाला निमंत्रित केले. त्या नऊवारी साडी परिधान करून आल्या खऱ्या; मात्र, त्यांच्या साडीला “मॅचिंग’ ब्लाऊज’ अवघ्या तीन तासांत कसा शिवून आणला गेला, याचा किस्सा डॉ. सतीश देसाई सांगताच विद्यार्थी अक्षरश: हास्यकल्लोळात बुडून गेले. निमित्त होते, मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी गुंफले. “मी एक आनंदयात्री’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्येष्ठ प्रवचनकार व लेखक डॉ. संजय उपाध्ये, कार्यवाह रामदास काकडे, विलास काळोखे, चंद्रकांत शेटे, शैलेश शाह, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मुकूंद खळदे, निरुपा कानिटकर, चंद्रभान खळदे, संदीप काकडे आदी उपस्थित होते.

डॉ. देसाई म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रसंग घडत असतो. एखादा मित्र भेटतो, नातेवाईक भेटतो. असे असंख्य व्यक्ती आपल्याला भेटतात. मात्र, प्रत्येकच व्यक्ती आपल्या लक्षात राहत नाही. आयुष्यामध्ये विविध व्यक्ती येत असतात. चांगली माणसे आयुष्यात आली, तर जगण्याचा अर्थ कळतो. आयुष्यातील किस्यांमुळे मी घडत गेलो. वर्षानुवर्षे काम करण्याची क्रेडीबिलिटी मला अनुभवातून अनुभवता आली. आयुष्यात येणाऱ्या लोकांमुळे आपले आयुष्य समृद्ध होत असते. विद्यार्थ्यांनीही दररोज डायरी लिहिण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.