शेवगाव – तालुक्यात सत्ता नसतांना माजी आमदार नरेंद्र पाटील घुले व चंद्रशेखर शेखर या घुले बंधूच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे स्वतंत्र कार्यालय काढून 11 हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली. तसेच त्यांना मदत मिळवून देण्यात आली.
करोना काळात गोरगरीब जनतेसाठी व रुग्णांना मदत करण्यासाठी सातत्याने झटत राहिले. हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी येथे केले.
कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्य व सुरक्षा संचचे वाटप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आ.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे सभापती ऍड. अनिल मडके, कृष्णा पायघन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, संभाजी तिडके, संजय शिंदे, विष्णुपंत बोडखे, डॉ.सुधाकर लांडे, प्रदीप काळे, समीर शेख, कृष्णा सातपुते आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे होते.
आ. पवार म्हणाले, करोना काळात अनेक मतदारसंघात भाजपचे आमदार असतांना तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरीकांना मदत केली. सामान्य जनतेने प्रश्न उपस्थित केल्यावर एक दोन महिने कोविड सेंटर काढून भाजपचे आमदार सामान्य जनतेला भुलवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका करून जिल्ह्यातील 140 कोटी रुपये विम्याचे अडकले होते.
मात्र पाठपुरावा करुन विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून दिली. सभापती डॉ. घुले म्हणाले, राष्ट्रवादीची सत्ता नसतांनाही तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडविले.