मदतीचा हात ; जागतिक बँकेकडून भारताला १ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. त्यातच आता भारताच्या मदतीसाठी जागतिक बँक धावून आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला  पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर  जागतिक बँकेने देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी १ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे.


करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबर आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सरकारकडून करण्यात येणाऱ्या या कामाला जागतिक बँकेने मदतीचा हात दिला आहे. जागतिक बँकेकडून भारताला विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी याची माहिती दिली.

जागतिक बँकेने  भारताला १ अब्ज डॉलरचे सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केले आहे. या माध्यमातून जागतिक बँक देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यासाठी केल्या जाणाऱ्या कामात सरकारची भागीदार असणार आहे, असे अहमद जुनैद यांनी सांगितले.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला. पण, लॉकडाउनमुळे थेट अर्थचक्रावरच परिणाम झाला असून, आर्थिक संकटाने डोकं वर काढले आहे. त्यामुळे सरकारच्या महसूलावर परिणाम झाला असून, राज्यानेही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या आर्थिक संकटाला तोंड  देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपये जाहीर केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.