कलंदर : मदत

उत्तम पिंगळे 

कालच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो होतो. सांगली-कोल्हापूरची पूरस्थिती निवळून हळूहळू जीवनमान सावरत आहे. सरकारची मदत मिळालीच आहे; पण नुकसान प्रचंड झालेले आहे व त्यातून सावरायला खूप वेळ लागणार आहे. सरकारबरोबर कित्येक स्थानिक, विविध खासगी संस्था व एनजीओज यांनीदेखील खूप मदत केली. वैयक्‍तिक मदतीचाही हातभार लागला. विविध ठिकाणांहून कपडे, खाण्याचे पदार्थ, कोरडे धान्य, पाणी, औषधे, आता हळूहळू वह्या, पुस्तके अशा विविध गोष्टींची मदत झालेली आहे. लोकांमध्ये परोपकाराची जाण अजूनही आहे हे सिद्ध झालेले आहे. एवढे बोलून प्राध्यापक थोडा वेळ थांबले व मला म्हणाले की, ही एक जमेची चांगली बाजू आहे परंतु या मदतीला दुसरीही एक किनार आहे. त्यावर मी म्हणालो, म्हणजे नेमके काय प्राध्यापक साहेब आपणास म्हणायचे आहे?

प्राध्यापक म्हणाले, कित्येक ठिकाणी मदत व्यवस्थित मिळाली पण हे सांगताना अतिशय खेद होत आहे की काही ठिकाणी आलेल्या मदतीस मदतीपेक्षा घरातील अडगळ बाहेर काढली असेच म्हणावे लागेल. मग मला पुढे प्राध्यापक सांगू लागले की काही ठिकाणी आलेल्या मदतीत तर जुने व फाटकेतुटके असे कपडे आले होते ते इतके खराब होते की कोणीच घेऊ शकणार नाही. आपल्याला नको असलेले व अत्यंत खराब असे कपडे आले होते. यात प्रामुख्याने चुरगळलेले व फाटलेले असे कपडे होते. बटणे हूक वगैरे नसलेले कपडे, अशी मदत देऊन काय कामाची? ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना तातडीची मदत हवी आहे. पुढे त्यांना सरकारी मदत, त्यांच्या आप्तेष्टांची, नातलगांची मदत मिळेल व तेही स्वतः सावरून उभे राहतील पण आज आवश्‍यक असलेली तातडीची मदत अशी मिळणे केव्हाही भूषणावह नाही.

काही कोरडे पदार्थ खराब होण्यास आले होते तसेच काही खराब झाले होते. काही पुस्तके जीर्ण व फाटलेली म्हणजे रद्दीच्या लायकीची होती. तुटलेल्या चपला, फाटके बूट, तसेच फाटकी दप्तरे काय कामाची? एक्‍सपायरी झालेले खाद्यपदार्थ, औषधे काय कामाची? अशी घेतल्यास उपायांपेक्षा अपायच होण्याची शक्‍यता जास्त. अर्थात, बऱ्याच अंशीची मदत चांगली व उपयोगी होती पण कसं आहे जे वाईटाचा उल्लेख पटकन होतो व जास्त पसरले जाते. यापेक्षा मदत दिलीच नाही तरीही चालेल.

मदत करणाऱ्याने ती करताना किमान असा विचार करावा की उद्या आपल्यावर असा प्रसंग आला आणि अशी मदत आली तर कसे वाटेल? असा विचार करून मगच मदत करावी. आपण मदत केल्याने एखाद्या अडलेल्याचा तातडीचा प्रश्‍न संपणार असेल व ती मदत केल्याचे आपणासही खरोखर समाधान मिळणार असेल तरच व तशीच मदत करावी.
घरातील अडगळ व कचरा गेल्याचा असुरी आनंद मिळणार असेल तर अशी मदत कोणालाही नको आहे. एखाद्याच्या जखमेवर आपण जर फुंकर घालू शकत नसलो तर किमान मीठ तरी चोळू नये. यापेक्षा मुख्यमंत्री सहाय्य निधी आहे त्यामध्ये सढळ हस्ते मदत करा. खरोखर प्राध्यापक खरे तेच बोलत होते. प्रत्येकाने या बाबतीत अंतर्मुख होऊन विचार करणे जरुरीचे आहे, असे मलाही पटले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×