गरीब कल्याण योजनेमुळे नागरिकांना मदत – पियुष गोयल

सिमला – प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमुळे करोनाच्या काळात गरीब जनतेला मोलाची मदत झाली असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधताना गोयल यांनी सांगितले की, करोनाच्या काळात भारत सरकारने अतिशय काळजीपूर्वक पॅकेज तयार केले होते. त्यामुळे गरीब लोकांबरोबरच लघुउद्योगांना मदत झाली. या कारणामुळे अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे.

करोनामुळे आपण अनेक अडचणी सहन केल्या आहेत. मात्र त्यामुळे अनेक संधीही निर्माण झाल्या आहेत. या संधीचा लघुउद्योगांनी आणि इतर उद्योगांनी फायदा करून घ्यावा आणि भारताला आत्मनिर्भर बनविण्याबाबत प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, करोनामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यामुळे अनेक नव्या संधी भारतासमोर निर्माण झाल्या आहेत. अनेक सुट्या भागाच्या पुरवठ्यासाठी इतर देश भारताकडे आशेने पाहत आहेत.

विविध क्षेत्रातील सुट्या भागाचा पुरवठा लघुउद्योगांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. लघुउद्योगांना या कामी आवश्‍यक ती मदत केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. या क्षेत्राला मुबलक भांडवल पुरवठा व्हावा यासाठी उद्योग सुलभता धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण कमालीचे यशस्वी झाले असून भारतामध्ये आता उद्योग सुरू करणे आणि चालवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे.

उद्योगांना विविध परवान्यासाठी आता एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगांना परवाना कालबद्ध पद्धतीने जारी करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगांना नोकरशाहीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. उद्योगांनी या संधीचा फायदा घेऊन आपली कार्यक्षमता वाढवून दर्जेदार आणि कमी किमतीची उत्पादने तयार केल्यास या उद्योगांना निर्यात वाढविण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये अर्थ व्यवस्थेची आणि नागरिकांची कमी हाणी झाली आहे. त्यामुळे भारतात वेगाने पूर्वपदावर येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.