बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरात कोरोनच्या संकटावर मात करण्यासाठी लढा देत असलेल्या पाचशेहून अधिक शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दोन वेळच्या भोजनाची सोय येथील श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगम्बर जैन देवस्थानच्या वतीने केली जात आहे. गेले दीड महिन्यांपासून देवस्थानच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. समाजिक बांधिलकी जपत इतरांना मार्गदर्शक ठरत असलेल्या या उपक्रमाचे बारामतीत सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. भीलवाडा तसेच बारामती पॅटर्ननुसार बारामतीत देखील लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. कोरोना या विषाणूजन्य संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. बारामतीचे नागरिक घरात सुरक्षित राहावेत यासाठी शासकीय व पोलिस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत .बारामतीकरांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था मात्र श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगम्बर जैन देवस्थानच्या वतीने केली जात आहे.
शासकीय ,प्रशासकीय, नगरपरिषद पोलीस तसेच आरोग्य विभागातील पाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन वेळचे जेवण या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दिले जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लढत असलेल्या शासकीय लढवण्यासाठी या संस्थेने एक हात मदतीचा दिल आहे. अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील उपहारगृहात जेवण बनवण्याची व्यवस्था करण्यात आलीआहे. श्री दिगंबर जैन समाजाच्या मदतीने गेले दिड महिना हा उपक्रम बारामतीत राबविला जात आहे. इथून पुढील काळातही लॉकडाऊन संपेपर्यंत बारामतीकरांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उभे असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही भोजन सेवा देण्यात येणार असल्याचे श्री दिगंबर जैन पंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
भोजन सेवेबरोबरच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने करण्यात आला. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे ,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगम्बर जैन देवस्थानच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम अभिनंदनास पात्र असल्याचे सांगत ऋण व्यक्त केले.