कर्जत (प्रतिनिधी) -सध्याच्या लॉकडाऊनमुळे कलावंतांना कामच उरले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यात तमाशा कलावंतांचेही आर्थिक नियोजन कोलमडल्याने त्यांना कुटुंब चालविणे मुश्किल झाले आहे. या प्रश्नावर कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील तमाशा कलावंत रेखा चव्हाण यांनी निवेदनाव्दारे आमदार रोहित पवार यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. या पत्रातून तमाशा कलावंतांच्या व्यथाही त्यांनी मांडल्या आहेत.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, मी कोरेगाव येथील रहिवासी असून झुंजार लोकनाट्य तमाशा मंडळाची संचालिका आहे. आम्ही आमच्या मंडळामार्फत कर्जत-जामखेड परिसरातील आणि गावात मनोरंजनाद्वारे समाजप्रबोधन करून मिळालेल्या मानधनातून उपजीविका करत असतो. परंतु सध्या सर्वत्र करोना रोगाने थैमान घातले असल्याने आमचे कार्यक्रम पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे आम्हा कलावंतांचा पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावागावात भटकंती करत कला सादर करून जीवन जगणाऱ्या कलावंतांना सध्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आमच्या तमाशा मंडळामध्ये सुमारे 34 कलावंत असून माझ्याबरोबर त्यांच्यावरही उपाशी राहण्याची वेळ आली आहे. आपण याचा विचार करून कलावंताच्या प्रश्नाला न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली.