शेवगाव: आज चैत्र कृष्ण पंचमी, श्री राजराजेश्वरी रेणुका मातेचा प्रकट दिन. या दिवशी श्री रेणुकांमातेचा जन्म झाला. श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुका देवस्थानात सध्या भाविकांना दर्शन बंद असले तरी देवस्थानचे गुरुजी तुषार देवा वैद्य व देविदास जोशी यांनी आज नैमित्तिक पूजा विधि बरोबरच आईसाहेबांच्या प्रकट दिनाची पूजा बांधली. तसेच आईसाहेबांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २० निराधार कुंटूंबाच्या किराणा साहित्याची व्यवस्था करण्यात आली.
देवस्थानात आज सकाळी श्री रेणुका मातेला दुधाचा अभिषेक घालण्यात येऊन शृंगार करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात पुष्प सजावट करण्यात आली. सुयोग देवा भालेराव यांनी सप्तशती पाठ केला. साडेअकराला महाआरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. सायंकाळी साडेसहाला आरती, अष्टक जोगवा व दुष्ट असे विधी झाले. त्यानंतर रात्री सव्वा आठला परशुराम पाळणा व शेजारती करण्यात आली.
सध्या करोनामुळे बेरोजगार, निराधाराच्या रोजीरोटीचे हाल होत असल्याने शेवगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक मदत कार्य राबवित आहेत. निराधारांना आधार देण्याच्या उद्देशाने किराणा साहित्याचे किट गरजवंताच्या घरी पोहच करत आहेत.
रेणुकादेवी संस्थानात दर पौर्णिमेला व अशा उत्सव सोहळ्याला भाविकांसाठी नियमीतपणे महाप्रसाद केला जातो. मात्र सध्या करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून दर्शनासहीत असे जाहीर उत्सव सोहळे व महाप्रसादही रद्द करण्यात आले आहेत. रेणुका भक्तानुरागी मंगलताई भालेराव यांचे हस्ते आज आईसाहेबांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून देवस्थानाच्या वतीने शेवगाव पाथर्डीच्या २० निराधार कुटुंबाना किराण्याचे किट वाटपासाठी निधी देणार आहेत.