जुन्नर – गेल्या महिन्याच्या २२ तारखेपासून लेण्याद्री डोंगरावर भाविकांसाठी प्रवेशबंद असल्यामुळे येथील शेकडो माकडांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या संचारबंदीचा फटका डोंगरावरील प्राण्यांना बसत असल्याचे लक्षात घेत जुन्नरच्या इंजिनिअर असोसिएशनने त्यांच्या खाद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
श्री गिरिजात्मजाची पूजा-अर्चा करण्यासाठी गडावर केवळ पुजारी जात असून माकडांना भाविकांकडून मिळणारे हक्काचे खाद्य संचारबंदीमुळे बंद झाले होते. डोंगरावरील माकडांना या संघटनेच्या सदस्यांनी केळी, फुटाणे, खोबरे व पिण्याचे पाणी आदी खाद्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. ठराविक कालावधीने पुन्हा या ठिकाणी येऊन हे कार्य संचारबंदी सुरू असेपर्यंत करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मुकेश ताजणे यांनी सांगितले.
या ठिकाणी मादी प्रजातींची संख्या तुलनेने अधिक असून त्यांसोबत त्यांची छोटी नवजात पिल्ले असल्याचे मिलिंद झगडे यांनी सांगितले. याप्रसंगी बंडू कर्पे, विनय वाबळे, तुषार लाहोरकर, जितेंद्र काळे, संतोष नवले, विलास कडलक आदींनी सहभाग नोंदविला. काही दिवसांपूर्वी या संघटनेने संचारबंदीमुळे उपासमार होत असलेल्या सुमारे १०० बांधकाम मजुरांना महिनाभराची शिधासामुग्री दिली होती.