पुणे – सध्याच्या लॉकडाऊन काळात मजूर, बेघर व गरजूंना जेवण पुरवण्यासाठी विंडसर आणि डिक्की या संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. याबाबत डिक्कीचे (दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स व इंडस्ट्री) यांनी समस्यांचे गांभीर्य समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणून चर्चा केली. या गरजू नागरिकांसाठी जेवण मिळावे यासाठी उद्योगपती राजेश बाहेती व पुण्यातील नामवंत बांधकाम संस्था विंडसर शेल्टर्सचे डायरेक्टर महेश राठी यांच्याशी चर्चा केली.
सोबतच पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशासनबरोबर चर्चा करून सीओईपी यांच्या वतीने कम्युनिटी किचनची व्यवस्था हॉस्टेल बिल्डिंगमध्ये करण्यात आली. दि. 27 मार्चपासून या शेल्टर्समधील नागरिकांना नाश्ता व दोन वेळेचा जेवण देण्यात आले.
तसेच ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर्ससाठी शासकीय विश्रामगृह येथे दुसरे किचन सुरू केले. तेथेही नाश्ता व दोन वेळेच जेवण देण्यात येत आहे. पोलिसांसाठीही सीओईपी येथे नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सीओईपी किचनमधील संपूर्ण किचन व्यवस्था राजेश बाहेती मित्र परिवार व विंडसर शेल्टर्सतर्फे सपना राठी व त्यांच्या टीमनी घेतलेली आहे. तर, हातावरचे पोट असण्याऱ्या कुटुंबासाठी मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन किटची वितरणाची जबाबदारी मैत्री कांबळे, कौस्तुभ होवाळे, अनिल होवाळे राजू साळवे या युवा उद्योजकांनी घेतलेली आहे. आजपर्यंत 7,000 पेक्षा जास्त किट व 45,000 पेक्षा जास्त फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. याबाबत विंडसर शेल्टर्सचे संचालक श्रीनिवास रसकोंडा म्हणाले की, समाजाला आणि गरजू नागरिकांना गरज आहे, तेव्हा त्यांना ती मदत पोहचवणे आमचे कर्तव्य आहे.
आजच्या कठीण परीस्थितीमध्ये सर्व उद्योजकांना पुढे घेऊन समाजाच्या गरजू लोकांची मदत करणे आवश्यक आहे. तर, हा सर्व उपक्रम लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे युवा उद्योजक हर्ष बाहेती यांनी सांगितले आहे.