नवी दिल्ली – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय देशातील 50 लाख हातमाग विणकरांना व हस्तशिल्प निर्मात्यांना त्यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी मदत करणार आहे. याकरिता सरकारचे ई-मार्केट प्लेस पोर्टल सुरू करण्यात आले असून याला 50 लाख कारागिरांना जोडले जाणार आहे. या सर्वांची माहिती आधार क्रमांकामुळे आमच्याकडे उपलब्ध झाली आहे. यामुळे विविध राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांना यांच्याकडून खरेदी करण्यासाठी मदत मिळणार आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यानी सांगितले.
त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्रालय नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरबरोबर सहकार्य करून ग्राहकांना या उत्पादकांशी व्यवहार करता येतील, अशी यंत्रणा विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हे कलाकार अधिकृत्त आहेत यावर वस्त्रोद्योग मंत्रालय शिक्कामोर्तब करणार आहे. त्यामुळे ही उत्पादने योग्य असल्याची ग्राहकांना खात्री मिळेल.