अंत्यसंस्कारासाठीचा पास मिळवण्यासाठी नातलगांना नरकयातना

पुणे  – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशानाकडून काही निर्णय घेतले गेले आहेत. काही निर्णयांत वेळोवेळी फेरफारही केला जात आहे. मात्र, आपण घेतलेल्या सर्व निर्णयांची योग्य अंमलबजावणी होते आहे का, हे पाहणेही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. अन्यथा कोणाच्या नाठाळपणाचा व कामचुकारपणाचा सर्वसामान्यानांच त्रास होत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत.

याबाबत एका नागरिकाने “प्रभात’चे लक्ष वेधून घेतले आहे. मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या नातलगाची अंत्यसंस्काराचा पास मिळविण्यासाठी झालेली फरफट आणि त्यामुळे त्याला झालेला नाहक आणि अनावश्यक मनस्तापाची माहिती या नागरिकाने सांगितली. दोन दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीच्या एका नातलगाचे मध्यरात्रीच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर एका इस्पितळात उपचार सुरू होते. “अंत्यसंस्कारांसाठी आवश्यक असणारा पास विश्रामबाग वाड्यातील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात मिळेल,’ असे त्यांना सांगण्यात आले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. संबंधित नातलग पास घेण्यासाठी ते अडथळे पार करून विश्रामबाग वाडा येथे पोहोचले. मात्र, तेथे पास देणारे कार्यालयच बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पास कुठे मिळेल, हे तेथे दारावर खडूने लिहून ठेवण्यात आले होते. त्यानुसार डॉ. कोटणीस रूग्णालय येथे जायला सांगण्यात आले होते. सदर व्यक्ती पास आवश्यकच असल्यामुळे नाईलाजाने कोटणीस रुग्णालयात गेली. तेथेही डोक्याला हात लावून घेण्याचीच वेळ आली. कारण हे रुग्णालय बंद होते. आता पुढे काय करायचे, याची माहिती देण्याची काहीही यंत्रणा तेथे नव्हती. शिवाय येथे पास देण्याची सुुविधा बऱ्याच काळापूर्वी बंद झाली असल्याचे त्यांना समजले.

अखेर पास मिळवण्यासाठी ससूनला जाण्याचा त्या मृताच्या नातलगाने निर्णय घेतला. मात्र मध्यवर्ती भागात असलेल्या ससूनला जाणे लॉकडाऊनच्या काळात अग्निदिव्यच. पण गरजवंताला त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नसतो, या न्यायाने ते मध्यरात्री पुन्हा असंख्य अडथळे पार करत ससूनला पोहोचले व अखेर त्यांना पास मिळाला. पण, या सर्व प्रकारामुळे अनेक प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या अडचणी अधोरेखित झाल्या आहेत. त्या कमी करणे किंवा नाहीशा करणे हे यंत्रणेच्या हाती असून त्यांनी याची दखल घ्यावी व नागरिकांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून याची माहिती द्यावी. वृत्तामध्ये उल्लेखित मुद्द्यांपैकी काहींचे उत्तर प्रशासनाकडे असेलही, मात्र सर्वसामान्यांना त्याची माहिती नसते. ती तपशीलवार देण्यासाठी प्रसार माध्यमांची मदत घेता येणार नाही का? असे केले तर संकटाच्या काळात भांबावलेल्या नागरिकांना होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

या परिस्थितीवरून निर्माण झालेले प्रश्न पुढीलप्रमाणे:

मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणाऱ्या पासची व्यवस्था स्मशानभूमीत अथवा त्या-त्या धर्माच्या अंत्यविधींच्या ठिकाणी करता येऊ शकत नाही का?

जर अगोदरच तशी व्यवस्था तेथे करण्यात आली असेल, तर त्याला वेळेचे बंधन कशासाठी? सरकारी कामकाजाच्या वेळेतच माणसे मरणार असे गृहीत धरले आहे का?

एखाद्याचा रात्री-अपरात्री मृत्यू झाला (जसे या प्रकरणात घडले आहे) तर त्याच्या नातलगांनी पुढची तयारी करायची, की पास मिळण्यासाठी पुणे दर्शन करत फिरायचे?

ज्या ठिकाणी पास देण्याची सुुविधा सुरू करण्यात आली आहे, तेथील व्यक्ती जागेवर आहे की नाही हे कोणी पाहायचे?

समजा जर तो जागेवर नसेल तर या अक्षम्य चुकीसाठी पीडिताने जाच सहन करावा, अशी अपेक्षा आहे का?

सध्या करोनामुळे भीतीचे सावट आहे. ससून रुग्णालयात करोनाच्या बाधितांवर उपचार सुरू आहेत. अशा स्थितीत लागण नसलेल्या व्यक्तींनी जीवावर उदार होऊन तेथे पास घेण्यासाठी जाण्याचा धोका कशाला पत्करावा?त्याची अन्यत्र सोय करता येणार नाही का?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.