द्रुतगती महामार्गावर हेलिपॅड; जखमींना मिळणार वेळेत उपचार

पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ओझर्डे (ता. मावळ) येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपघातांमधील जखमींना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी याठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

विधानपरिषदेमध्ये याविषयी तारांकीत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. द्रुतगती महामार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड उभारण्याचे 2016 पासून प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामासाठी अडीच वर्षांपासून विलंब होत असल्याबाबतचा प्रश्‍न आमदारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी सांगितले की, ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड बांधण्यासाठी 2012 मध्येच निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. याठिकाणी ट्रामा केअर सेंटरसाठी 3 हजार 400 चौरस फूट इमारत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. तसेच हेलिपॅड बांधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. ट्रामा केअर सेंटरसाठी महामंडळाने ऑपरेटिंग एजन्सीची नियुक्‍ती केली आहे. सध्यस्थितीत या इमारतीची डागडुजी करून ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

पाच वर्षांत 1 हजार 436 अपघात
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मागील पाच वर्षांत एप्रिल 2019 पर्यंत एकूण 1 हजार 436 अपघात झाले असून त्यामध्ये 518 जणांचा बळी गेला आहे. तसेच 593 जण गंभीररित्या जखमी झाले आहे. तर 128 जण किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.