नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात एकच गोंधळ सुरु झाला आहे. पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर वरून नवीन संसद भवनासमोर महापंचायत भरवण्यासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
एवढे नाही तर त्यानंतर पोलीस आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला. नवीन संसद भवनाकडे आगेकूच करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवले. यावेळी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे. तत्पूर्वी कुस्तीपटू दोन अडथळे पार करून येथे पोहोचले.