सोलापूर – राज्यात मान्सूनचे आगमन आणखी काही दिवसांवर असले तरी सोलापुरात बुधवारी विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेली तीन महिने सोलापूरकरांनी 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानासह कडक उन्हाळा सहन केला. अंगाची लाही – लाही करणाऱ्या या उन्हाळ्यात अनेकांची दमछाक झाली. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोलापुरात ढगाळ वातावरण आहे.
तीन दिवसापूर्वी हलक्या सरी कोसळल्यानंतर प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सायंकाळपर्यंत सुरू होता. उकाड्याने त्रस्त असलेल्या सोलापूरकरांना बुधवारच्या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.