कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस!

महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाःकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे.

पण तरीही सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण आता हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 2 ऑगस्टपर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापुरात शुक्रवारी जोरदार पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठाण्यात सुद्धा शुक्रवारी अतिवृष्टी होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिली.

पाटणच्या डावरे चोपडेवाडी गावचा डोंगर खचू लागला
सातारा जिल्ह्यामध्ये पाटण ढेबेवाडी विभागातील येथील डावरी चोपडेवाडी गावच्या खाली असणारा डोंगर पावसाने खचु लागला आहे. यामुळे 65 घरांना धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीच्या काळात अनेक एकर जमीन वाहून गेली आहे.

नागरिकांनी मिळेल तेथे आसरा घेतला असून शासनाने नागरिकांना संसारोपयोगी साहित्य व आश्रय देण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. त्या गावामध्ये शासकीय यंत्रणा येथे पोहचलीच नसल्याची माहिती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.