सातारा – सातारा शहर व परिसराला सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. तसेच खटाव, फलटण, कराड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.साताऱ्यात दुपारपर्यंत उन्हाचा चटका होता. पाच वाजता अंधारुन आले आणि धो-धो पाऊस कोसळू लागला. गेल्या काही दिवसांपासून उसंत घेत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पावसाने ब्रिटीशकालीन नेर तलाव भरला आहे. फलटणच्या दक्षिणेकडील भागात पावसाने ओढेनाले खळाळून वाहिले.
कराडसह परिसरात विजांच्या कडकडाटासह सुरु झालेल्या परतीच्या पावसाने कराडकरांना झोडपून काढले. त्यामुळे सर्वांचीच धांदल उडाली. सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी दुपारी पडलेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून परिसरातील शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. कराड ते वाठार दरम्यान महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी ओढे तुंबल्यामुळे सेवा रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
शेतातील पाण्यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली वाठारसह परिसराला गेले दोन दिवसात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतांमध्ये सुरु असणारी आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमधून बाचावलेली खरिपाची पिके चांगली वाढलेली आहेत. या पिकांची सध्या आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. परंतु गेले दोन दिवसांपासून अचानकपणे परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. असाच जर अजून काही दिवस मोठा पाऊस झाला तर हाताची पिके वाया जातील, अशी शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. तसेच कराड ते मालखेड दरम्यान महामार्गालागतचे ओढे पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी तुंबले आहेत. त्यामुळे हे पाणी सेवा रस्त्यावर आले आहे. सेवा रस्त्यावरील पाण्यामुळे ठिकठिकाणी लहानमोठ्या वाहनधारकांची या रस्त्यावरून प्रवास करताना त्रेधात्रिरपट उडालेली पहावयास मिळाली. गेले काही दिवसांपासून पावसाने उसंत दिल्यामुळे प्रवासी रेनकोट, छत्री विना प्रवास करत होते. त्यांची या अचानक आलेल्या पावसाने चांगलीच फजिती झाली.