दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान

पिके जोमात आल्याने शेतकरी कोळपणीत व्यग्र
पुसेगाव (प्रतिनिधी) –
पावसाने दमदार सुरुवात केल्याने उत्तर खटाव तालुक्‍यातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सुरूवातीच्या टप्प्यात पडलेल्या पाऊसानंतर अनेक दिवस पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्‍यात आली होती. मात्र काही दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने आले, घेवडा, सोयाबीन, बटाटा, ऊस आदी पिकांना जीवदान मिळाले आहे.

या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस वेळेत झाल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपून घेतली. मात्र पिक उगवून आल्यानंतर पावसाने ओढ दिली. उन्हाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली.

उन्हाळ्यासारखे ऊन पडू लागल्याने पिके करपण्याच्या अवस्थेत पोहचली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता. त्यात भरीस भर अनेक गावात सोयाबीन पिकावर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. योग्य प्रतीचे बियाणे उपलब्ध न झाल्याने त्याचा फटका सहन करावा लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय टाळेबंदीमुळे मालवाहतुकीला बंदी असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा जाग्यावरच नासून गेला. अशा एक ना अनेक अडचणीतून जात असताना शेतकऱ्यांना नक्की करावे असा प्रश्‍न पडला होता. मात्र गेल्या आठवड्यापासून तालुक्‍यातील अनेक गावात काही वेळ का होईना मुसळधार पाऊस झाला. ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. जलसंधारणाद्वारे झालेले बंधारे तुडुंब भरुन वाहिले. या पावसाने खरीपातील सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. अनेक गावात सोयाबीन व घेवड्याची कोळपणी सुरू असल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.