Rain Alert : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. परिणामी अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे.

कोकणाच्या किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

रायगड, रत्नागिरी, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 30 जुलै आणि 31 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 30 आणि 31 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.